संत वचनांच्या आधार


संत व समाज-सुधारकांच्या वचनांच्या आधार घेतो !

जोवर मनुष्याच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण होत नाही, तोवर अंधश्रध्दा निर्मूलन चळ्वळीचे कार्यकर्ते कोणत्याही धार्मिक कार्यास प्रत्यक्ष विरोध करण्यास जात नाहीत. मंदीर, गिरिजाघर-चर्च, मशिदीस विरोध करीत नाहीत.

ज्या चुकीच्या, निरर्थक वा अमानुष धार्मिक चालीरीती आहेत, रुढी व परंपरा आहेत, त्या विरुध्द भाषणातून संयमित भाषेत, तार्किक आधारावर जनप्रबोधन करतो लोकांना समाजावून सांगतो.

काही रुढी परंपरा कशा टाकाऊ आहेत हे पटवून देताना ज्यांचे धर्मप्रेम संशयातीत आहेत अशा स्वातंत्र्यवीर सावरकर ,प्रबोधनकर ठाकरे ,महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आदी थोर लोकांच्या वचनाच्या आधारे आणि संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज आदि संतांच्या अभंग-ओव्यांच्या आधारे आम्ही जनप्रबोधन करतो. म्हणूनच गेल्या २९ वर्षात सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणावर आमच्या व्याख्यानांना जमते. आमचं म्हणणं ऐकून घेते, त्यावर विचार करते. शक्य झाल्यास ,पटल्यास स्वतात बदल घडवून आणते. पण कधीही आम्ही त्यांचा धर्म तुडवायला निघालेले धर्मविध्वंसक आहोत असा आरोप सामान्य जनतेने आमच्यावर केलेला नाही वा लोक कधी विरोधात गेले नाहीत.
अन्यथा कोणत्याही पोलीस वा अन्य संरक्षणाशिवाय अगदी दूरवरच्या खेड्यात ५ ते १० हजारांच्या सभा एकट्या-दुकट्या कार्यकर्त्यांना पार पाडताच आल्या नसत्या. आमचा देवा-धर्माला विरोध नाही या सर्वांनी मिळून घेतलेल्या भूमिकेमुळेच हे शक्य झाले

मग सत्यनारायणाच्या पूजेच्या विरुध निदर्शने का?
सत्यनारायणाचा धर्माशी काही संबंध नाही. ती एक निर्माण झालेली निरर्थक रुढी आहे. स्वतः संत गाडगे महाराजांनी सत्यनारायणावर कडाडून टीका केलेली आहे. सत्यनारायणाच्या पोथीची खिल्ली उडवली आहे. तो साराच भाग चळवळीचं एक प्रबोधनाचे हत्यार म्हणून आम्ही सांगतो, अगदी विस्तारानं सांगतो एवढंच नव्हे तर पेशवाई बुडाल्यावर स्वतःच्या दक्षिणेची सोय करण्यासाठी, पोथ्या निर्माण करुन लोकाना लुबाडण्याचा धंदा ब्राम्हणांनी उभारला होता. त्यातुनच असल्या पोथ्यांची निर्मिती झाली हे प्रबोधनकार ठाकरेंचे मत (गाडगे महाराज चरित्रः प्रबोधनकार ठाकरे) आम्ही आवर्जून सांगतो.
पण हा सगळा विचार जेव्हा माणसं शांत डोक्यानं ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत असतात तेव्हाच सांगून उपयोग होऊ शकतो. किमान प्रबोधन करणा-या कार्यकर्त्याना तरी एवढं कळलं पाहिजे.

मधल्या काळात पुण्याला काही लोकांनी एका शाळेत होऊ घातलेल्या सत्यनारायण महापूजेला विरोध केला. तिथे १०१ सत्यनारायण घातले जात होते. त्याऐवजी एकच घाला अशी मागणी केली म्हणे! प्रत्यक्षात वातावरण तापून विरोधकाची प्रतिक्रिया म्हणून १०१ एवजी १११ सत्यनारायण घातले गेले. अशा बातम्या प्रसिध्द झाल्यात. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने हा विरोध केला होता असा उल्लेख बातम्यात असल्यामुळे महाराष्ट्रभरातून आम्हाला विचारणा होऊ लागली. विदर्भ, मराठ्वाडा, खानदेश, प. महाराष्ट्र, गोवा, मुंबई अशा ठिकाणांवरुन कार्यकर्त्यांनी विचारपूस केली. असा आतातायी निर्णय अनिसच्या पूणे शाखेने कसा घेतला? असा सा-या विचारणा-यांचा सूर होता. तर सामान्य जनतेने वेगळ्या पध्द्तीने धारेवर धरले. "आता तुम्ही शाळेत चालणा-या सत्यनारायणाला विरोध करता तर मुस्लिम (उर्दू) व ख्रिश्चन शाळेतही धार्मिक उत्सव चालतात. त्याही शाळांसमोर जाऊन तुम्ही निदर्शने का करत नाहीत?

या सगळ्याच प्रश्नाने आम्ही हैराण झालो होतो. त्यामुळे जाहीर खुलासा करणे आवश्यक आहे सत्यनारायणाच्या पुजेला प्रत्यक्ष निदर्शनाद्वार विरोध करणे हे अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या धोरणाशी सुसंगत नाही. उलट हिंदू शाळांमधल्या सत्यनारायण पूजेला विरोध करणार असतील त्यांनी मुस्लिम व ख्रिश्चन शाळांमधून चालणा-या निरर्थक व अवैज्ञानिक धार्मिक कार्यक्रमांना अशीच निदर्शने करुन विरोध केला पाहिजे, हे आम्हाला मान्य करावेच लागते.
यासंबंधी आम्ही एवढेच सांगू शकतो की ज्यांनी कुणी अशा निदर्शनांद्वारा सत्यनारायणाला विरोध केला ते अगदी नवखे आहेत. त्यांना अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीचा पुरेसा अनुभव नाही .म्हणून त्यांनी हे आतातायी पाऊल उचलले. यापूढे जर त्यांनी अशीच चुक पुन्हा केली तर..... 

जरी ते अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे नांव वापरत असले तरी त्यांचा आमच्याशी, म्हणजे गेल्या २९ वर्षापासून कार्य करीत असलेल्या अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीशी संबंध नाही असे आम्ही जाहीर करु. नवख्यांची एखादी चूक क्षम्य समजावी ना?