अभा अंनिस व इतरांमध्ये कोणता फरक आहे ?

अन्यथा वेगळ्या बॅनरखाली काम करा !
सुरवातीपासूनच देव-धर्मावर सडकून हल्ले केल्याशिवाय अंधश्रध्दा निर्मूलन होतच नाही असे ज्यांना वाटायचे, त्यांना आम्ही काही लोक ठणकावून संगायचो की अंधश्रध्दा निर्मूलन समिती व अंधश्रध्दा निर्मूलन चळवळ हा शब्द वापरायचाच असेल तर ज्या भूमिकेतून ही समिती निर्माण झाली ती मर्यादा तुम्हाला पाळावीच लागेल. अन्यथा तुम्ही वेगळ्या नावाखाली काम करा. दुसरे कोणतेही नाव घेऊन नव्या बॅनरखाली देवा-धर्मावर सडकून हल्ले करा! मग आमची हरकत नाही.
अधूनमधून हा वाद डोके वर काढायचाच. आता समितीला बरे दिवस आले होते. केवळ विरोध व शिव्या वाटयाला न येता कौतुक व प्रसिद्धीही मिळू लागली होती. त्यामुळे अनेक सामाजिक शेत्रातले स्थिरावलेले नेते चळ्वळीकडे आकर्षित होऊ लागले. त्यांची वैचारिक बांधिलकी व समाजात असलेली त्यांची वैचारिक पुरोगामित्वाची प्रतिमा त्यांना चळ्वळीची ही भूमिका स्वीकारण्यास अडचण करीत असे. आपल्या बावन्नकशी पुरोगामित्वावर कुठेतरी बट्टा लागतोय असे त्यांना वाटल्यामुळे पुन्हा पुन्हा अंधश्रध्दा निर्मूलनाच्या मंचावरुन देवा धर्माची चिकित्सा झाली पाहिजे असा सूर ते लावीत असत. शिवाय लोकशाही प्रक्रियेप्रमाणे याही मुद्यावर पुन्हा चर्चा झाली पाहिजे, असा ते आग्रह धरु लागले.