तरीही आरोप होतीलच ...


तरी स्वार्थी आरोप करतीलच !

अर्थात एवढं सगळं वाचूनही अंधश्रध्दा निर्मूलन समिती अंधश्रध्दांच्या नावाखाली देव, धर्म उखडून टाकायचेच काम करतेय, असा आरोप कुणी करणार नाही, या भ्रमात आम्ही नाही. केवळ गैरसमजापोटी तो सामान्य व अंधश्रध्दांमध्ये ज्यांचे स्वार्थ गुंतले नाहीत, अशा हिंदूत्ववादी वा धर्मवादी संघटनांनी करु नये एवढीच अपेक्षा आहे.

चमत्काराच्या नावाखाली लुबाडणारे बाबा, देव अंगात आल्याचे सोंग करुन स्वताच्या नादी लावणारे बुवा, मंत्रतंत्राचे स्तोम माजवणारे भगत-तांत्रीक हे सगळेच आपली बदमाशगिरी देवाच्या, धर्माच्या आड दडूनच करीत असतात. त्यामुळे स्वाभाविकपणे जेव्हा आमची लढाई त्यांच्याविरुध्द, त्यांच्या लबाड्यांविरुध्द सुरु होते तेव्हा ते कांगावा करु लागतात. अनिसचा हल्ला देवा-धर्मावर आहे, असा ओरडा करु हिदुंत्ववादी संघटनांच्या आश्रयाला जाऊन दडू पाहतात. त्यावेळी हिदुंत्ववादी संघटनांनीही अशा बदमाशांना आपले संरक्षण मिळणार नाही, यांची काळजी घेतली पाहिजे.

एकदा का आमची लढाई अशी उघड बदमाशगिरी करुन लोकांना लुबाडणा-या भोंदूविरुध्द सुरु झाली, की मग आम्ही थांबत नाही. १० पैशाचा खडा २० रुपयांना विकणारा बोलका पत्थरवाला असो, चमत्काराआड दडणारा काटेलचा गुलाबबाबा असो, यांच्या संरक्षणासाठी स्थानिक हिदुंत्ववादी संघटना धावूनही उपयोग झाला काय? त्यांच्या व्यवसायाला सत्याचा भक्कम आधार नाही, त्यांच्या विषयाला शास्त्रीय पूरावा नाही. आमच्या प्रखर जनांदोंलनामुळे आपल्याच हिंदुत्ववादी संघटनेची बदनामी होतेय, या भयापोटी त्यांना अशा बदमाशांचा पाठिंबा मध्येच काढून टाकावा लागला. अकोल्याच्या शुकदास महाराजाला मदत करु पाहणा-या एका हिंदुत्ववादी संघटनेला गप्प बसविण्यासाठी चंद्र्शेखर गाडगीळांची हिंदुत्ववादी संघटनापुढे सरसावली होती.

म्हणूनच आम्हाला जाहीररीत्या सांगावेसे वाटते की, कोण्त्याच धर्मप्रेमी संघटनेला आपल्या धर्मतील लोक अंधश्रध्देच्या गर्तेत खितपत पडून राहणे भूषणावह नाही. अशा अवस्थेत त्यांची किमान लबाडी करुन लोकांना फसवणा-या बदमाशांची तरी संरक्षक फळी बनू नये. हे त्यांच्याही हिताचे नाही, समाजाच्याही हिताचे नाही आणि आपल्या धर्मबांधवांच्याही हिताचे नाही हे त्यांनाही पटेल, नव्हे पटतेच.